Thursday, June 6, 2013

- भाग्यदेवता -

आयुष्याच्या सागरात हेलकावे खाताना 
गच्च काळोखात भरकटलेलो असताना
अचानकच एक प्रकाश शलाका दिसली
जणू माझी भाग्यदेवताच साक्षात प्रकटली 

तिला मी स्पर्श करायला गेलो
अशक्य ते शक्यही झाले
मनाला शिडकावा मिळाला
वाटले आता ही आपलीच झाली

भाग्यदेवतेने मला निवडल्यानंतर
मला स्वर्ग चार बोटे उरला नाही
पण नशीबात सहजपणे जे येते 
ते आपल्याला मिळतेच असे नाही

जगाचे स्वतःचे असे काही नियम आहेत

लायकी तपासण्याच्या उभ्या-आडव्या रेषा आहेत
प्रेमाच्या राज्यात मी भाग्यदेवतेला सुखी करु शकलो
पण जगाच्या नजरेत मात्र मी नालायक ठरलो

कोषातील प्रत्येक धाग्याकडे लक्ष देऊन विणलेले
माझे प्रेमाचे भावविश्व तटातटा तुटू लागले
ज्ञात विश्वातून अज्ञात जगात मी कोसळू लागलो
आपटत-फुटत कसेबसे स्वतःला सावरु लागलो 

पण फार फार उशीर होऊन गेला होता
उठून उभे राहण्यासाठी पायात बळ नव्हतं
जगण्यासाठी शिल्लक उमेद राहिली नव्हती 
स्फुंदत बसण्यापलिकडे हातात काही राहिलं नव्हतं

मागे वळून पाहण्यात आता काही अर्थ राहिला नव्हता
भाग्यदेवतेच्या पाठमोर्‍या प्रतिमेचा अर्थ लागत नव्हता
आहे ते स्वीकारले आणि कसाबसा उभा राहिलोय
कचकड्यासारखे तुकडे झालेल्या मनाला गोळा करत बसलोय

बराच काळ गेला आणि भाग्य पुन्हा फिरु लागले
भाग्यदेवतेचे दर्शन अधून मधून होऊ लागले
पण मला आता त्या भाग्यदेवतेची ओढच नाही
जिला देव्हार्‍यात बसवले होते तीच आता दिसत नाही

चेहरा तोच असला तरी तिच्यामागचे रुप वेगळे आहे
जिला मी हृदयांत बसवले तिचे रुप वेगळे होते 
हृदयाचे कचकड्यासारखे तुकडे झाले तेव्हाच खेळ संपला
मनाच्या देव्हार्‍यातील भाग्यदेवता तेव्हाच भंग पावली

भग्न देव्हार्‍यात मूर्तीची स्थापना होऊ शकते, पण 
भग्न मूर्तीची देव्हार्‍यात पुन्हा स्थापना कशी होईल?
मन खूप नाजूक असते, ते तोडताना तू कठोर झालीस

पण आज माझे मन संवेदनाहीन झाले त्याला काय करणार? 

आज तेच रुप समोर आहे पण मनात ओढही नाही
जो मूल्यवान काळ निघून गेला त्याची खंतही नाही
जगाच्या वाटा अगणित आहेत त्या मी आता ओळखतो  
मीच वेडा होतो की त्या एकाच वाटेचे स्वप्न पहात होतो 

- सागर

No comments: