Wednesday, November 6, 2013

मृत्यू...

मृत्यू...
सर्वांच्या मनांत थैमान घालणारा
कुठे शांत तर कुठे रौद्र रुप धारण करणारा
तरीही...
प्रत्येकाला अमरत्वाचे विष पाजणारा
कधी नकळत उचलून नेणारा
तर कधी हिंस्त्र वेदना देणारा
मलाही... तो हवाय 
एका अज्ञात विश्वात नेणारा...
थंड नि बोचर्‍या स्पर्शाने कापवणारा
तसाच जाळणार्‍या उष्म्याने हादरवणारा
हिंस्त्र श्वापदाच्या तोंडाने लचके तोडणारा
एकमेवाद्वितिय तो...
मृत्यू...!!!

- सागर

Monday, July 29, 2013

झालो मी दंग

देवाच्या दारी आता रंगला अभंग
आज माझ्या काळजाचा झाला रसभंग
राजाची राणी तेव्हा आली नाही संग
लग्न लागले तिचे नि झालो मी दंग
- सागर

Thursday, June 20, 2013

व्यथित आज झालो

कधी नव्हे ते व्यथित आज झालो
तुझ्या एका अनपेक्षित आघातानं
दुसर्‍यांचे सर्व सहन करत आलो 
कोसळलो मात्र आजच्या घावानं

विरंगुळ्याच्या क्षणांत गुरफटलो जरा
शिक्षा अशा चुकीसाठी की जी झालीच नाही?
मूर्खपणाच सगळा झाला खरा
पण का मला समजावता आला नाही?

प्रेमात भीती नसावी कधीही 
पण आज मी भ्यालो आहे
आक्रंदत आहे मन तरीही
मी मात्र नि:शब्द झालो आहे

-सागर

Thursday, June 13, 2013

आठवणींत तू

आनंद गोठला मनात माझ्या
जशा गुलाबाच्या पाकळ्या
आठवणींत तू  आजही माझ्या
प्रत्येक श्वासात मोकळ्या
- सागर

Friday, June 7, 2013

सात जन्म

तुझे लोभस डोळे पाहिले नि मी माझा न राहिलो
आस तुझीच लागली मला नि अगदी कासावीस झालो
तळमळत दिवस जात होते नि तुझ्यात मी पूर्ण गुंतलो
आज तू माझी झालीस नि सात जन्म भरून पावलो 
- सागर

Thursday, June 6, 2013

प्रीती उघडली

आज तिने घाबरत घाबरत त्याचा हात हातात घेतला
कातर मनाने त्याच्यावर असलेली प्रीती उघडली
त्याला जणू प्रेमाचा आणि आनंदाचा खजिनाच गवसला
अंगावर पडलेल्या बादलीभर पाण्याने झोप मात्र उडाली ...

- सागर

- भाग्यदेवता -

आयुष्याच्या सागरात हेलकावे खाताना 
गच्च काळोखात भरकटलेलो असताना
अचानकच एक प्रकाश शलाका दिसली
जणू माझी भाग्यदेवताच साक्षात प्रकटली 

तिला मी स्पर्श करायला गेलो
अशक्य ते शक्यही झाले
मनाला शिडकावा मिळाला
वाटले आता ही आपलीच झाली

भाग्यदेवतेने मला निवडल्यानंतर
मला स्वर्ग चार बोटे उरला नाही
पण नशीबात सहजपणे जे येते 
ते आपल्याला मिळतेच असे नाही

जगाचे स्वतःचे असे काही नियम आहेत

लायकी तपासण्याच्या उभ्या-आडव्या रेषा आहेत
प्रेमाच्या राज्यात मी भाग्यदेवतेला सुखी करु शकलो
पण जगाच्या नजरेत मात्र मी नालायक ठरलो

कोषातील प्रत्येक धाग्याकडे लक्ष देऊन विणलेले
माझे प्रेमाचे भावविश्व तटातटा तुटू लागले
ज्ञात विश्वातून अज्ञात जगात मी कोसळू लागलो
आपटत-फुटत कसेबसे स्वतःला सावरु लागलो 

पण फार फार उशीर होऊन गेला होता
उठून उभे राहण्यासाठी पायात बळ नव्हतं
जगण्यासाठी शिल्लक उमेद राहिली नव्हती 
स्फुंदत बसण्यापलिकडे हातात काही राहिलं नव्हतं

मागे वळून पाहण्यात आता काही अर्थ राहिला नव्हता
भाग्यदेवतेच्या पाठमोर्‍या प्रतिमेचा अर्थ लागत नव्हता
आहे ते स्वीकारले आणि कसाबसा उभा राहिलोय
कचकड्यासारखे तुकडे झालेल्या मनाला गोळा करत बसलोय

बराच काळ गेला आणि भाग्य पुन्हा फिरु लागले
भाग्यदेवतेचे दर्शन अधून मधून होऊ लागले
पण मला आता त्या भाग्यदेवतेची ओढच नाही
जिला देव्हार्‍यात बसवले होते तीच आता दिसत नाही

चेहरा तोच असला तरी तिच्यामागचे रुप वेगळे आहे
जिला मी हृदयांत बसवले तिचे रुप वेगळे होते 
हृदयाचे कचकड्यासारखे तुकडे झाले तेव्हाच खेळ संपला
मनाच्या देव्हार्‍यातील भाग्यदेवता तेव्हाच भंग पावली

भग्न देव्हार्‍यात मूर्तीची स्थापना होऊ शकते, पण 
भग्न मूर्तीची देव्हार्‍यात पुन्हा स्थापना कशी होईल?
मन खूप नाजूक असते, ते तोडताना तू कठोर झालीस

पण आज माझे मन संवेदनाहीन झाले त्याला काय करणार? 

आज तेच रुप समोर आहे पण मनात ओढही नाही
जो मूल्यवान काळ निघून गेला त्याची खंतही नाही
जगाच्या वाटा अगणित आहेत त्या मी आता ओळखतो  
मीच वेडा होतो की त्या एकाच वाटेचे स्वप्न पहात होतो 

- सागर

Wednesday, June 5, 2013

वेळ नाही

माझे प्रेम तर प्रामाणिक होते, पण
प्रेमभंगाचे दु:ख मिळाले, हरकत नाही
आज ती परत येऊ पहाते आहे, पण 
आता माझ्याकडे तिच्यासाठी वेळ नाही

अग्निकुंड

तू दिलेल्या कडवट प्रेमभंगाने
आयुष्य माझे कोसळले
आपल्या दोघांतील गोड आठवणींचे 
एका क्षणात अग्निकुंड पेटले
- सागर

हसत गेलो...

फिरता फिरता एकत्र आलो 
अन् एकमेकांचे होऊन गेलो
फिरुन त्याच रस्त्यावर आज आलो
स्वतःला एकटे बघून हसत गेलो... 
- सागर

Monday, June 3, 2013

जखमा

तू खोल हृदयांत दिलेल्या जखमा 
आजही ताज्या रक्ताने वहात आहेत 
तुझ्या प्रेमाने विखुरलेल्या माझ्या भावना 
आजही तितक्याच ओथंबलेल्या आहेत. 
- सागर

पाऊस

आभाळ असं आज कोसळलं
आसमंत सारं झाकोळून गेलं
वादळ वारं जोरात वाहून आलं
पाऊस कसं वऴवाचा घेऊन आलं
-सागर

Monday, May 27, 2013

एक मधुर साद

एक मधुर साद खिडकीतून आली
दहाव्या मजल्यावर मला मोहून गेली 
आवाजाची जादू मनावर अलगद पसरली
पण पायाची हाडे मोडल्यावरच जाग आली ...

- सागर

बुद्ध

एक बुद्ध तो होऊन गेला
मनात शांतता घेऊन गेला
दोन हजार वर्षांचा काळ गेला
तरी आमचा जन्म निर्बुद्ध गेला...
- सागर

कमी शब्द वापरुन केलेली एक चारोळी

कर हवं ते
पण मनं जप
जग तुझं ते
एक नवं तप
-सागर

Thursday, May 16, 2013

२ चारोळ्या : सहजच सुचलेल्या



लोभस हे डोळे

मनात उतरे
मुखचंद्र झाकोळे
अवघे विश्व सारे
- सागर


प्रीतमोहर मनी फुलला नि

लाल रंगात न्हाऊनि ह्या
केशसंभार उलगडला नि
विरघळून गेला मोहात ह्या
- सागर