Wednesday, November 30, 2011

सुखाची झोप

खलास झालो आज मी
परिस्थितीशी लढता लढता
हताश झालो आज मी
स्वप्नांना अग्नी देता देता

कष्ट केले, धन कमावले
तरी उरेना पुरवता पुरवता
ऋण काढले, सोहळे केले
आनंद विकत घेता घेता

पैसे कमावले, कर भरले
अपेक्षा परतीची ठेवता ठेवता
घर बांधले, व्याज भरले
नाकीनऊ आले ते फेडता फेडता

सुख हरवले, मन उदास झाले
रक्ताचा थेंब आटवता आटवता
भाग्य रुसले, नशीब फुटले
सुखी माणसाचा सदरा शोधता शोधता

वाटते आता, जुने दिवसच छान होते
शरीराच्या गरजा कमी होत्या
पोटभर अन्न आणि सुखाची झोप
याशिवाय दुसर्‍या चिंता नव्हत्या

~सागर

Thursday, June 23, 2011

नकार

आठवणींत तुझ्या झुरायला लागलो
विरघळून देखील उरायला लागलो


विखारी कटाक्ष तुझे दुर्लक्षिले अन्  
स्वप्नांत तुझ्या मी रमायला लागलो 


असह्य होऊन एक दिवस तू सुनावलेस अन् 
स्वप्नविश्वाच्या पायर्‍या मी उतरायला लागलो


मनास माझ्या कसेबसे समजावले अन् 
नकार तुझा मी पचवायला लागलो ...

झिडकारलेस रागावून मला तू अन् 
मग माझेच थडगे मी पुरायला लागलो


~सागर

Wednesday, June 22, 2011

थेंब...


थेंब न् थेंब पाण्याचा, जीवनात रस भरणारा 
थेंब न् थेंब घामाचा, कष्टात आनंद देणारा  


थेंब न् थेंब आसवाचा, दु:खात भार हलका करणारा 
थेंब न् थेंब आसवाचा, सुखात समाधान देणारा  


थेंब न् थेंब सागराचा, अगस्तीने पिऊनही उरणारा 
थेंब न् थेंब विषाचा, महादेवाने पिऊनही पचवणारा


थेंब न् थेंब अत्तराचा, सर्वत्र  सुगंध दरवळणारा 
थेंब न् थेंब मद्याचा, प्याल्यात असाच वाहून जाणारा 


थेंब न् थेंब 'सागराचा ' आता क्षणात विरुन जाणारा
मिटल्या पापणीतून ओघळण्या आधीच गोठून जाणारा


~सागर

Friday, June 10, 2011

नाशकात


पंचवटी तीर्थस्थान
विसरे लोकांचे भान
त्र्यंबकेश्वराला मान
नाशकात...
पडते पाऊल वाकडे
काळारामला साकडे
पांडवलेण्या आग्रा रोडकडे
नाशकात...



सावरकरांचे भगूर
बिटकोपासून थोडे दूर
भद्रकालीपासून फारच दूर
नाशकात.....
सीबीएसच्या एसट्या
कॉलेजरोडच्या पोरट्या
सोमेश्वरी भेटी चोरट्या
नाशकात...



सप्तश्रूंगी गड फार वर
मोहवून टाकी परिसर
भक्त चढे सरसर
नाशकात...
शालिमार गजबजलेला
शेअर रिक्षांनी भरलेला
मेनरोड खरेदीने फुललेला
नाशकात...
सातपूरच्या इंडस्ट्र्या
सिडकोच्या कॉलन्या
गोदावरीच्या वाहिन्या
नाशकात ...
ब्रह्मगिरीवर सुसाट वारा
आसमंत भन्नाट सारा
वेड लावी निसर्गाचा पसारा
नाशकात...
~सागर

पुण्यात ...


आमची प्रेरणा अर्थातच
१. अ‍ॅडी जोशींची कोकणात 
२. स्वामीजींची बंगळुरात
आणि
३. विशालची पुण्यात
पुण्यात भाग - २
थोरला बाजीराव
दिवेघाटावर पडाव
मस्तानी तलाव
पुण्यात...
पेशव्यांचा शनिवारवाडा
टिळकांचा केसरीवाडा
कष्टकर्‍यांचा कुंभारवाडा
पुण्यात...
मार्केटयार्डची गुलटेकडी
सर्वात उंच वेताळ टेकडी
राम अन् हनुमान टेकडी
पुण्यात...
गणपती सारसबागचा
मान कसबापेठचा
श्रीमंत मात्र दगडूशेठचा
पुण्यात...
पर्वती पायथा
सिंहगडच्या गाथा
चतु:शृंगीचरणी माथा
पुण्यात....
छोट्या नारायणरावाची पेठ
सदाशिवराव भाऊंची पेठ
वारांनुसार हरेक पेठ
पुण्यात...
चांभार आळी
तांबट आळी
शिंदे नि शिंपी आळी
पुण्यात....
भाऊ रंगारी बोळ
मुंजाबाचा बोळ
भाऊ महाराजांचा बोळ
पुण्यात...
तुळशीबागेचा बाजार
स्त्रियांचा संसार
सराफ बाजार
पुण्यात....
पासोड्या विठोबा चौक
ज्ञानेश्वर पादुका चौक
बालगंधर्व चौक
पुण्यात...
जंगलीमहाराज रस्ता
लक्ष्मी रस्ता
खरेदीला सस्ता
पुण्यात...
लक्ष्मीनारायण चिवडा
जोशींचा वडा
तुटून पडा
पुण्यात...
सुजाता नि गुजर जोडी
मस्तानी-आईसक्रीमला
चितळे बंधूंची बाकरवडी
पुण्यात...
विद्यापीठ नावाजलेले
तंत्रज्ञान पुढारलेले
लोकं सुधारलेले
पुण्यात...
विश्रामबागवाडा
महात्मा फुले वाडा
सतत पाण्याचा सडा
पुण्यात...
शंकर महाराजांचे धनकवडी
पाताळेश्वर शांत आवडी
अशी ही अमुची पुनवडी
पुण्यात...
अजून काय काय यात राहिले आहे देवच जाणे ... 
पुणे आमचे असे काही संपणार नाही एवढ्यात wink
~सागर

Tuesday, April 26, 2011

मी आणि तू


ही कविता लिहिताना एक वेगळे आव्हान पेलायचा माझा प्रयत्न होता, कमी शब्दांत जास्त भावना व्यक्त करणे. तो किती सफल किंवा असफल झाला हे कविताप्रेमींनीच ठरवावे.
कवितेमागची भूमिका: 
प्रियकर प्रेयसीच्या प्राप्तीसाठी आतुर आहे आणि ती त्याला शेवटची भेटते आहे. अनेक आर्जवे करुनही प्रेयसी काही प्रियकराला स्वीकारत नाही. पुढे प्रेयसी तिच्या वाटेने जाते आणि तिच्या नशिबी विवंचनाच येते. पुढे प्रियकर मृत पावतो आणि प्रेयसीला एक पश्चातापाची हुरहुर लागते की तिने हे काय केले.
बदलत्या परिस्थितीनुसार प्रियकर आणि प्रेयसीचे भाव शब्दांत बांधण्याचा हा एक प्रयत्न.
मी शब्द
तू नि:शब्द,
मी दग्ध
तू स्तब्ध
मी भग्न
तू मग्न
मी आकांत
तू शांत
मी अंगार
तू शृंगार
मी मृत
तू अमृत
मी मुक्त
तू त्यक्त
मी धगधग
तू तगमग
मी समर्पित
तू गर्भगळीत
मी पलिकडे
तू अलिकडे
मी चेतनाहीन
तू भावनाहीन
मी जगलो मरुन
तू मेलीस जगून...
~सागर