Tuesday, December 2, 2025

रात्रीच्या काळोखात...

रात्रीच्या काळोखात चंद्र कोमेजलेला
तपोवनातले प्रत्येक झाड घाबरलेला

रक्षक दिवसभर कसायांशी लढलेला
थकून भागून मग झोपायला गेलेला

अंधारात झाडे कापण्याचा डाव साधलेला
अशाच कामात त्यांचा हातखंडा असलेला

रक्षक सकाळी आल्यावर होणार रडवेला
मिठी मारलेल्या झाडाला बघणार कापलेला

सागर 
#वृक्षवल्ली_आम्हा_सोयरी #तपोवन #झाडे_वाचवा #नाशिक #निसर्ग #एकही_झाड_तोडायचे_नाही
#मराठी #मराठीकविता #मराठीभाषा 

Tuesday, November 25, 2025

तपोवन

 


 
 
 
 
जनतेचा १००% असलेला विरोध नाकारून "नाशिकच्या तपोवनात वृक्षतोड होणारच" असे सरकारच्या पवित्र्यावरून दिसते आहे. त्या खिन्नतेतून उमटलेले हे प्रकटन
===================================
 
चंद्र आहे साक्षीला अन झाडे ती कापलेली
जमीन आहे सोबतीला पण उजाड झालेली 
 
हिरवेगार असलेले देखणे लुगडे फेडलेली
पिल्लांच्या प्रेतांनी घरटी अस्तव्यस्त पसरलेली
 
अहंकारी सत्ताधीश आणि त्यांची सत्ता उन्मत्त झालेली
निसर्गप्रेमी नि संतापलेली प्रजा खिन्न दु:खी झालेली
 
पहा डोळे उघडून भ्याडांनो, लाज तुमची मेलेली
होते कधीकाळी "तपोवन" इथे, खूण त्याची मिटलेली
- सागर

 

Thursday, November 20, 2025

विसाव्याचे ते क्षण

 


विसाव्याचे ते क्षण,
आले तसे गुपचूप निघून गेले
जगण्यातले ते कण
मिळाले तसे लगेच सांडून गेले !

मनात वाढलेले ते तण,
कोपऱ्यात होते ते मापून गेले
बघता बघता रंगले रण
मनावर ओरखडे देऊन गेले

कातर झालेले ते अवचित क्षण
रोमांच अनुभवण्या आधी सुटून गेले
घाईने वेचलेले एक दोन कण
आसवे ओघळल्या लाटेत वाहून गेले ...
- सागर 

 
#मराठी #मराठीकविता #मराठीसाहित्य
#असेच_सुचले_असेच_खरडले #सागर 

Sunday, May 18, 2025

प्रेम

प्रेम..
नदीसारखे निर्मळ वाहते
मनावर फुंकर घालते
सर्वांना हवेहवेसे वाटते

मन..
खऱ्यासारखे भ्रमित करते 
आठवणींत रमवत असते
नेहमीच गोंधळात टाकते

हृदय...
मनाचे कधी कधी ऐकते
प्रेमाचे संगीत अनुभवते 
तरीही अडचणीत सापडते

आयुष्य...
मनाचे कधीतरी ऐकते 
हृदयाचे स्वर स्वीकारते
प्रेमाचे संगीत असेच वाजते !

-#सागर 
#मराठी #मराठीकविता #मराठीभाषा 
#असेच_सुचले_असेच_लिहिले

Monday, August 26, 2024

चांगली कविता लिहिण्याचे बेसिक तंत्र


कविता लिहिताना शब्दांवर लक्ष दिले की आशय गडबडतो.
आशय सशक्त हवा. तो आधी आपल्या मनासारखा लिहून काढावा. 
ती कविता उस्फुर्त असते. त्या कवितेला नंतर शब्द बदलून आकार द्यावा. पण आशय हरवणार नाही याची काळजी घ्यावी. मग. निर्माण होणाऱ्या रचना खूप सुंदर होतात.
पुढे पुढे आशयाला समर्पक शब्द देखील सुचत जातात..

उदाहरणार्थ 
मुसळधार पावसात पसरलेला हा गारवा 
जणू प्रेमाच्या रसातला शिडकावा

यात मुसळधार पाऊस गारवा आणतो तर प्रेमात भिजलेल्याला शिडकावा हे तृप्ततेचे प्रतीक म्हणून वापरले आहे..

ही ओळ शब्दांत बांधायचा प्रयत्न करू आशय न हरवता.

मुसळधार पाऊस नि त्यातला हा गोड गारवा
जणू प्रेमरसात चिंब ओला करणारा शिडकावा 


मी काही उत्तम कवी नाही. पण आशय लक्षात घ्यावा म्हणून हे उदाहरण उस्फूर्तपणे सुचले तसे दिले. 🙂🙏🏻

Thursday, July 9, 2020

चांदणी

आकाशातली चांदणी उगाचच लुकलुकते
प्रभेने आपल्या ती इतरांचे लक्ष वेधून घेते
पृथ्वीच्या आकर्षणाने ती ओढली जाते
आणि त्यातच ती भस्मसात होऊन जाते ...
- सागर 

Friday, May 12, 2017

पहिल्या पावसाच्या जलधारांचा शिडकावा

बेभान वारा
ग्रीष्माच्या झळांना
विस्कटून टाकतो

वसुंधरेच्या पोटात
उष्णतेचे काहूर
थैमान घालते

आसमंत सारा
अनामिक तलखीने
कासावीस होतो

तेव्हाच...

ढगांत लपलेला
पाऊस करतो
तप्त मनांवर
पहिल्या पावसाच्या
शीतल जलधारांचा
शिडकावा....

- सागर

Thursday, May 11, 2017

झेप घे मानवा....

पहाटेच्या निवांत वेळी
उडणार्या पक्ष्यांनो
सकाळच्या निरागस वातावरणाचे
भान तुम्ही दिले...

निरव शांततेच्या काळी
सावरणार्या मनांनो
आयुष्याच्या कठीण अश्वमेधांचे
शिरकाण तुम्ही केले...

वादळी पावसाच्या आभाळी
कोसळणार्या विजांनो
उभारी घेण्याच्या सामर्थ्याचे
अर्घ्य तुम्ही दिले...

झेप घे मानवा.... झेप घे ...
-सागर

Tuesday, January 13, 2015

प्रेम हे असं का असतं?

प्रेम हे असं का असतं?
कोणीतरी उस्फूर्तपणे प्रेम करतं
त्यात वाहवून जावंसं वाटतं
पण तसं प्रेम का फसतं?

कोणीतरी मनात आरपार रुतत असतं
तिच्याबरोबर प्रेम करता येत नसतं
तरीसुद्धा मनाला तिचंच प्रेम हवं असतं
पण मन बेईमान होण्यास तयार नसतं



सागरात सरितेला लुप्त व्हायचं असतं
तिला एकजीव होऊन जायचं असतं
पण सागरास प्रेमरसात न्हायचं असतं
खारट चव सावरत जगायचं असतं

 
- सागर

Monday, May 12, 2014

प्रत्येक क्षण

जगायचा प्रत्येक क्षण असा
की निराशेला हेवा वाटावा ...
निराशेचा क्षण आला तसा
की उचलून लगेच फेकावा ....


- सागर