Friday, June 10, 2011

पुण्यात ...


आमची प्रेरणा अर्थातच
१. अ‍ॅडी जोशींची कोकणात 
२. स्वामीजींची बंगळुरात
आणि
३. विशालची पुण्यात
पुण्यात भाग - २
थोरला बाजीराव
दिवेघाटावर पडाव
मस्तानी तलाव
पुण्यात...
पेशव्यांचा शनिवारवाडा
टिळकांचा केसरीवाडा
कष्टकर्‍यांचा कुंभारवाडा
पुण्यात...
मार्केटयार्डची गुलटेकडी
सर्वात उंच वेताळ टेकडी
राम अन् हनुमान टेकडी
पुण्यात...
गणपती सारसबागचा
मान कसबापेठचा
श्रीमंत मात्र दगडूशेठचा
पुण्यात...
पर्वती पायथा
सिंहगडच्या गाथा
चतु:शृंगीचरणी माथा
पुण्यात....
छोट्या नारायणरावाची पेठ
सदाशिवराव भाऊंची पेठ
वारांनुसार हरेक पेठ
पुण्यात...
चांभार आळी
तांबट आळी
शिंदे नि शिंपी आळी
पुण्यात....
भाऊ रंगारी बोळ
मुंजाबाचा बोळ
भाऊ महाराजांचा बोळ
पुण्यात...
तुळशीबागेचा बाजार
स्त्रियांचा संसार
सराफ बाजार
पुण्यात....
पासोड्या विठोबा चौक
ज्ञानेश्वर पादुका चौक
बालगंधर्व चौक
पुण्यात...
जंगलीमहाराज रस्ता
लक्ष्मी रस्ता
खरेदीला सस्ता
पुण्यात...
लक्ष्मीनारायण चिवडा
जोशींचा वडा
तुटून पडा
पुण्यात...
सुजाता नि गुजर जोडी
मस्तानी-आईसक्रीमला
चितळे बंधूंची बाकरवडी
पुण्यात...
विद्यापीठ नावाजलेले
तंत्रज्ञान पुढारलेले
लोकं सुधारलेले
पुण्यात...
विश्रामबागवाडा
महात्मा फुले वाडा
सतत पाण्याचा सडा
पुण्यात...
शंकर महाराजांचे धनकवडी
पाताळेश्वर शांत आवडी
अशी ही अमुची पुनवडी
पुण्यात...
अजून काय काय यात राहिले आहे देवच जाणे ... 
पुणे आमचे असे काही संपणार नाही एवढ्यात wink
~सागर

Tuesday, April 26, 2011

मी आणि तू


ही कविता लिहिताना एक वेगळे आव्हान पेलायचा माझा प्रयत्न होता, कमी शब्दांत जास्त भावना व्यक्त करणे. तो किती सफल किंवा असफल झाला हे कविताप्रेमींनीच ठरवावे.
कवितेमागची भूमिका: 
प्रियकर प्रेयसीच्या प्राप्तीसाठी आतुर आहे आणि ती त्याला शेवटची भेटते आहे. अनेक आर्जवे करुनही प्रेयसी काही प्रियकराला स्वीकारत नाही. पुढे प्रेयसी तिच्या वाटेने जाते आणि तिच्या नशिबी विवंचनाच येते. पुढे प्रियकर मृत पावतो आणि प्रेयसीला एक पश्चातापाची हुरहुर लागते की तिने हे काय केले.
बदलत्या परिस्थितीनुसार प्रियकर आणि प्रेयसीचे भाव शब्दांत बांधण्याचा हा एक प्रयत्न.
मी शब्द
तू नि:शब्द,
मी दग्ध
तू स्तब्ध
मी भग्न
तू मग्न
मी आकांत
तू शांत
मी अंगार
तू शृंगार
मी मृत
तू अमृत
मी मुक्त
तू त्यक्त
मी धगधग
तू तगमग
मी समर्पित
तू गर्भगळीत
मी पलिकडे
तू अलिकडे
मी चेतनाहीन
तू भावनाहीन
मी जगलो मरुन
तू मेलीस जगून...
~सागर

Tuesday, December 29, 2009

याचक

दरवाज्यावर उभा मी
हात पसरुनि
पडले माझ्या पदरी
माझेच दान
अपेक्षा केली कधी नव्हे ते
पण,
कधीतरी केलेल्या अपेक्षेचे
काय होणार?
फ़क्त अपेक्षाभंग...???
कित्येक वर्षे गेली
आणि ज्या कुशीत
निश्चिंत मनाने
गाढ झोपत होतो
ती कूस
हक्काची कधी नव्हतीच...!
या जाणीवेला काय म्हणावे?
जीवनात मरण ... की मरणात जीवन?
माहीत नाही ... पण
मी मात्र कायमच राहिलो आहे
जीवनात माझ्या
...फ़क्त आणि फ़क्त
एक याचक ....

Tuesday, August 25, 2009

प्रेमात कोणी पडत नाही

प्रेमात कोणी पडत नाही
...ते आपोआप होते
कधी होते ते कळत पण नाही
आणि कळते तेव्हा काही सुचत नाही
~सागर

Thursday, April 30, 2009

-- माझ्या काही चारोळ्या --

आठवणींच्या गर्तेत बुडणे
हे प्रेमवीरांचे स्वप्न असते
तुझ्या नेत्रकटाक्षांनी घायाळ होणे
हेच आमच्या नशीबी असते -१-

दोन मनांचे मिलन होणे
हे घर उभारणे असते
एकमेकांना सावरत जगणे
हे घर टिकवणे असते -२-

एके काळी ती मनात होती
आणि जग नव्हते
आता जग आहे
आणि ती मनात नाहिये... -३-


कोळ्याचे विखुरलेले धागे विणणे
जसे अविश्रांत चालू असते
आमचे तुटलेले धागे गोळा करणे
तसे अविरत चालू असते - ४ -

तू माझी होणं
वाटलं तितकं सोपं नव्हतं
तुला नजरेत भरणं
एवढंच माझ्या हातात उरलं होतं - ५ -

सापानं अंडी गिळल्यावर
पक्ष्यानं आक्रोश करणंच बाकी उरतं
तू दुसर्‍याची झाल्यावर
आसवं टिपणंच माझ्या हाती उरतं ... - ६ -

नियती दाराशी आल्यावर मी म्हणालो
छे छे , हा माझा वृथा भ्रम आहे
नियतीही चकीत झाली नि म्हणाली
हा तर स्वप्नांच्या मागे धावणारा मनुष्य आहे - ७ -

राखेतून उठून भरारी मारणं
हे जसं फिनिक्स पक्ष्याचं वैशिष्ट्य आहे
तसं मला जिवंतपणी मरण देणं
प्रिये! हे तुझं वैशिष्ट्य आहे... - ८ -

पूर्वेची तांबडफुटी पाहताना
भान हरपायला होतं
तसं प्रिये तुला पाहताना
मला जग विसरायला होतं - ९ -
- सागर

Sunday, April 19, 2009

येथे कर माझे जुळती

त्या लहानग्या हाताचा स्पर्श
जाणवत नव्हता जणू तिला
सर्व लक्ष लागले होते तिचे
दरवाज्याकडे
का बरे असे व्हावे?
या दरवाज्यातून आत येणारा
मनसोक्त लुटणार होता तिला
आणि विझवणार होता
डोंब वासनेचा...
हे सगळं
ती सहन करणार होती
त्याने दिलेल्या पैशासाठी
तिला हवा होता
पैसा... फक्त पैसा
त्याच नराधमांनी
जन्मास घातलेल्या
त्या लहानग्या जीवासाठी
त्या लहानग्याचे भविष्य
घडविण्यासाठी....

- सागर

Wednesday, December 17, 2008

प्रेमाचा अधिकार

प्रेमाचा अधिकार
कधी काळी होता
तेव्हा चूक केली
आणि फक्त पश्चातापच उरला
कर्तव्याचा संसारसुरु झाला पण,
विस्मरण झाले की
आता प्रेमाचा अधिकार
उरला नाही आपल्यापाशी
जपावे घरकुल
सांभाळावा संसार
तेच विश्व झाले माझे...
थोडेसे स्थिरावलो संसारात अन्
परत एकदा,
हृदयातील प्रेमाला एक कोवळा
अंकुर फुटला
नकळतच
तसेही प्रेम कोणी ठरवून करत नाही
पण हळू हळू
त्या प्रेमांकुराचे रोपटे झाले
अन्
एकदम भानावर आलो
हे काय करत आहोत आपण?
स्वतःलाच प्रश्न विचारला
हृदय नको म्हणत होते
पण मन घट्ट करणे आवश्यक होते
उखडले ते रोपटे
आणि भिरकावून दिले जनसागरात
आता ते रोपटे शिव्याशाप देत आहे
देणारच
का देऊ नये?
मोठ्या वृक्षाचे स्वप्न अस्तित्त्वात येण्याअगोदरच
एका प्रेमळ रोपट्याचा अंत झाला होता
उद्या दुसरी जमीन मिळेलही
त्या रोपट्याला
पण प्रेमाचा तो ओलावा?
तो कुठे मिळणार?
पाणी कुठेही मिळेल त्या रोपट्याला
पण त्या पाण्यातून मिळणारे प्रेम मात्र आटले
नव्हे आटवावे लागले
दुसरा पर्याय नव्हता
खरेच नव्हता....
काय करु मी तरी?
एकाच वेळी दोन स्वप्नांत कसा जगू?
कोणतेतरी एक स्वप्न खरे होणार ना?
दोन्ही स्वप्ने खरी होऊ शकतात का?
आजतरी मला हृदयावर दगड ठेवणे भाग आहे
परत एकदा प्रेमाचा अंकुर जन्म घेऊ नये
ही काळजी घेणे भाग आहे
नाहीतर एका घरकुलाच्या वृक्षाची
आहुती पडेल
स्वतःशीच बजावले
कर्तव्यापोटी मनाला समजावणे
हेच आता हाती उरले....
- सागर

Wednesday, July 9, 2008

जरा अपनाके तो देखिये हमे |

इतने भी क्या खफां हो हमसे
के आप हमे दोस्त मानते नहीं
जरा अपनाके तो देखिये हमे
शायद जिंदगीभर आप साथ छोडेंगे नही

- (कधी कधी शायर असलेला) सागर

Friday, May 23, 2008

एवढी दया नको रे दाखवू...

१३ मे, २००८ ला जयपूरला बाँबस्फोट झाले
त्याच शोकांतिकेतून मनात उमटलेली ही कविता....
खरेतर ही कविता नाही... भावना आहेत.... त्यातून समाजप्रबोधन झाले आणि लोकांनी कोणाला जवळ करावे ....करु नये याचा बोध घेतला.... तर ती अतिरेक्यांच्या कारवायांना बळी पडलेल्या प्रत्येक आत्म्याला श्रद्धांजली असेन.

हे देवा,
एकच मागणे तुझिया चरणी
एवढी दया नको रे दाखवू...

होवोत अजुनि स्फोट, वाहोत अश्रूंचे लोट
मरो कुणाचा बाप, मरो कुणाची आई
जोपर्यंत स्वत:चा आत्मा जळत नाही
तोपर्यंत मुर्दाड लोकांना कसली आहे घाई?

स्वतःची मुलगी पडलेली असेल
प्रेतांच्या ढिगार्‍यात बेवारशी
स्वतःच्या रक्ताचे वाहणारे पाट दिसेल
तरच धमनी फुगेन जराशी

धावा-मारा हा गोंधळ ऐन वेळी कशाला?
शेजारी अतिरेकी उभा केला
तेव्हा का बेसावध राहिला?
तुमच्या तळतळाटाने का तो मेला?

तुमच्या रक्ताचे पाणी करुन
सीमेपार तो गेला
उंच्या हॉटेलात उंची खाना खाऊन
त्याच्याच मस्तीत तो जिरुन गेला

आभाळ फाटले ते आपले,
काळीज कापले गेले ते आपले
तो 'अफजल्या' रोज ज्या रोट्या तोडतो
त्यासाठी पैसे खिशातले गेले ते आपले

म्हणूनच म्हणतो रे देवा, एवढी दया नको रे दाखवू...
होऊन देत अजून काही स्फोट.....
कधीतरी रक्तात अंगार फुलेल, डोळ्यांत रक्त उतरेन...
अवघा भारत एक होईन, तेव्हा मात्र पानिपत अतिरेक्यांचे होईन.....
(भारताचे उज्वल भवितव्याचे स्वप्न उरी असलेला...)- सागर

Tuesday, March 25, 2008

सरिता

सरिता येथे सागरमय होते

सर्वस्व अर्पून प्रेमा करता...

अथांग सागरात काहूर माजते

एकेक दिशा सावरता सावरता....
(अथांग) सागर