Friday, December 21, 2007

तुझ्या डोळ्यांचा थांग घेताना

तुझ्या डोळ्यांचा थांग घेताना
मीच अथांग होऊन जातो...

तुझ्या हसण्याचा आनंद घेताना
मीच आनंदून जातो ...

तुझ्या गुंतण्याचा आवेग पाहताना
मीच गुंतून जातो ...

तुला स्वप्नांमध्ये हरवलेलं पाहताना
मीच हरवून जातो ...

तुझ्या हाताला स्पर्श करताना
मलाच तुझा स्पर्श होतो ...

तुझ्या डोळ्यांतील अश्रू टिपताना
मीच त्यांत विरघळून जातो...
- सागर

पाखरु : भाग १ (कवितासंग्रह)

प्रियकराला प्रेयसीपासून तोडून दूर कोठेतरी पाठवले... तेव्हा प्रियकरास पक्ष्याकडे पाहून त्याची आणि आपली अवस्था सम वाटली...त्या अवस्थेचे वर्णन म्हणजे हा पाखरु कवितासंग्रह.... या संग्रहाचे विशेष म्हणजे सर्व कविता या एकाच मनोभूमिकेतून लिहिल्या आहेत....की दूरदेशी प्रियकराच्या मनात कोणते विचार प्रकटतात....

धन्यवाद- सागर


पाखरु:
:१:

मी खूप दूर भरारी घेतली गं, पण
तेथून परतायला मला जमेल का?
माझे पंख तुझ्या वाटेकडे फडफडताहेत, पण
त्यांना बंधनातून मुक्त होणं जमेल का?
- सागर
(१७-०५-२००० रात्री ११ वा।५० मि.)

:२:
पाखराला खूप दूरवर नेण्यात आलंय
कसं सांगू तुला?
त्याच्या झेप घेण्याच्या क्षमतेवर
बंधनं आली आहेत.... नव्हे लादली गेली आहेत ...

कदाचित, थव्यामध्ये राहिल्यामुळे,
तुझं मन दुसरीकडे गुंतणं शक्य आहे,पण,
ज्याचा थवा म्हणजे तुझा सहवास होता,
त्या थव्यापासूनच पाखराला तोडण्यात आलं
आता त्या पाखराला नव्या थव्यात टाकलं,
तरीही ते पाखरू एकटंच राहणार आहे
कायमचंच, कदाचित....

तूच सांग, ज्या सर्वस्वासाठी
त्या पाखराची सर्व धडपड चालली होती
तेच सर्वस्व त्याच्यापासून हिरावून घेतल्यावर
ते पाखरु तरी काय करणार? ...
- सागर

:३:
पाखरु सध्या शांत आहे, स्थितप्रज्ञ आहे

परिस्थितीचा वेध घेतंय...
एक एक क्षण, कित्येक युगांसारखा वाटतोय, अन
क्षणोक्षणी मन तुझ्याकडे झेप घेतंय
पण अजूनही पाखरु हतबल आहे
तुझ्यापर्यंत झेप घेण्याइतकं बळ
त्याच्या पंखात आहे, पण
कितीही बळ पंखात असलं तरी,
शृंखलांनी बद्ध असलेलं पाखरु
तुझ्यापर्यंत झेप घेऊ शकेल का?
- सागर