Tuesday, April 26, 2011

मी आणि तू


ही कविता लिहिताना एक वेगळे आव्हान पेलायचा माझा प्रयत्न होता, कमी शब्दांत जास्त भावना व्यक्त करणे. तो किती सफल किंवा असफल झाला हे कविताप्रेमींनीच ठरवावे.
कवितेमागची भूमिका: 
प्रियकर प्रेयसीच्या प्राप्तीसाठी आतुर आहे आणि ती त्याला शेवटची भेटते आहे. अनेक आर्जवे करुनही प्रेयसी काही प्रियकराला स्वीकारत नाही. पुढे प्रेयसी तिच्या वाटेने जाते आणि तिच्या नशिबी विवंचनाच येते. पुढे प्रियकर मृत पावतो आणि प्रेयसीला एक पश्चातापाची हुरहुर लागते की तिने हे काय केले.
बदलत्या परिस्थितीनुसार प्रियकर आणि प्रेयसीचे भाव शब्दांत बांधण्याचा हा एक प्रयत्न.
मी शब्द
तू नि:शब्द,
मी दग्ध
तू स्तब्ध
मी भग्न
तू मग्न
मी आकांत
तू शांत
मी अंगार
तू शृंगार
मी मृत
तू अमृत
मी मुक्त
तू त्यक्त
मी धगधग
तू तगमग
मी समर्पित
तू गर्भगळीत
मी पलिकडे
तू अलिकडे
मी चेतनाहीन
तू भावनाहीन
मी जगलो मरुन
तू मेलीस जगून...
~सागर