Tuesday, December 2, 2025

रात्रीच्या काळोखात...

रात्रीच्या काळोखात चंद्र कोमेजलेला
तपोवनातले प्रत्येक झाड घाबरलेला

रक्षक दिवसभर कसायांशी लढलेला
थकून भागून मग झोपायला गेलेला

अंधारात झाडे कापण्याचा डाव साधलेला
अशाच कामात त्यांचा हातखंडा असलेला

रक्षक सकाळी आल्यावर होणार रडवेला
मिठी मारलेल्या झाडाला बघणार कापलेला

सागर 
#वृक्षवल्ली_आम्हा_सोयरी #तपोवन #झाडे_वाचवा #नाशिक #निसर्ग #एकही_झाड_तोडायचे_नाही
#मराठी #मराठीकविता #मराठीभाषा 

Tuesday, November 25, 2025

तपोवन

 


 
 
 
 
जनतेचा १००% असलेला विरोध नाकारून "नाशिकच्या तपोवनात वृक्षतोड होणारच" असे सरकारच्या पवित्र्यावरून दिसते आहे. त्या खिन्नतेतून उमटलेले हे प्रकटन
===================================
 
चंद्र आहे साक्षीला अन झाडे ती कापलेली
जमीन आहे सोबतीला पण उजाड झालेली 
 
हिरवेगार असलेले देखणे लुगडे फेडलेली
पिल्लांच्या प्रेतांनी घरटी अस्तव्यस्त पसरलेली
 
अहंकारी सत्ताधीश आणि त्यांची सत्ता उन्मत्त झालेली
निसर्गप्रेमी नि संतापलेली प्रजा खिन्न दु:खी झालेली
 
पहा डोळे उघडून भ्याडांनो, लाज तुमची मेलेली
होते कधीकाळी "तपोवन" इथे, खूण त्याची मिटलेली
- सागर

 

Thursday, November 20, 2025

विसाव्याचे ते क्षण

 


विसाव्याचे ते क्षण,
आले तसे गुपचूप निघून गेले
जगण्यातले ते कण
मिळाले तसे लगेच सांडून गेले !

मनात वाढलेले ते तण,
कोपऱ्यात होते ते मापून गेले
बघता बघता रंगले रण
मनावर ओरखडे देऊन गेले

कातर झालेले ते अवचित क्षण
रोमांच अनुभवण्या आधी सुटून गेले
घाईने वेचलेले एक दोन कण
आसवे ओघळल्या लाटेत वाहून गेले ...
- सागर 

 
#मराठी #मराठीकविता #मराठीसाहित्य
#असेच_सुचले_असेच_खरडले #सागर 

Sunday, May 18, 2025

प्रेम

प्रेम..
नदीसारखे निर्मळ वाहते
मनावर फुंकर घालते
सर्वांना हवेहवेसे वाटते

मन..
खऱ्यासारखे भ्रमित करते 
आठवणींत रमवत असते
नेहमीच गोंधळात टाकते

हृदय...
मनाचे कधी कधी ऐकते
प्रेमाचे संगीत अनुभवते 
तरीही अडचणीत सापडते

आयुष्य...
मनाचे कधीतरी ऐकते 
हृदयाचे स्वर स्वीकारते
प्रेमाचे संगीत असेच वाजते !

-#सागर 
#मराठी #मराठीकविता #मराठीभाषा 
#असेच_सुचले_असेच_लिहिले