प्रेमाचा अधिकार
कधी काळी होता
तेव्हा चूक केली
आणि फक्त पश्चातापच उरला
कर्तव्याचा संसार सुरु झाला पण,
विस्मरण झाले की
आता प्रेमाचा अधिकार
उरला नाही आपल्यापाशी
जपावे घरकुल
सांभाळावा संसार
तेच विश्व झाले माझे...
थोडेसे स्थिरावलो संसारात अन्
परत एकदा,
हृदयातील प्रेमाला एक कोवळा
अंकुर फुटला
नकळतच
तसेही प्रेम कोणी ठरवून करत नाही
पण हळू हळू
त्या प्रेमांकुराचे रोपटे झाले
अन्
एकदम भानावर आलो
हे काय करत आहोत आपण?
स्वतःलाच प्रश्न विचारला
हृदय नको म्हणत होते
पण मन घट्ट करणे आवश्यक होते
उखडले ते रोपटे
आणि भिरकावून दिले जनसागरात
आता ते रोपटे शिव्याशाप देत आहे
देणारच
का देऊ नये?
मोठ्या वृक्षाचे स्वप्न अस्तित्त्वात येण्याअगोदरच
एका प्रेमळ रोपट्याचा अंत झाला होता
उद्या दुसरी जमीन मिळेलही
त्या रोपट्याला
पण प्रेमाचा तो ओलावा?
तो कुठे मिळणार?
पाणी कुठेही मिळेल त्या रोपट्याला
पण त्या पाण्यातून मिळणारे प्रेम मात्र आटले
नव्हे आटवावे लागले
दुसरा पर्याय नव्हता
खरेच नव्हता....
काय करु मी तरी?
एकाच वेळी दोन स्वप्नांत कसा जगू?
कोणतेतरी एक स्वप्न खरे होणार ना?
दोन्ही स्वप्ने खरी होऊ शकतात का?
आजतरी मला हृदयावर दगड ठेवणे भाग आहे
परत एकदा प्रेमाचा अंकुर जन्म घेऊ नये
ही काळजी घेणे भाग आहे
नाहीतर एका घरकुलाच्या वृक्षाची
आहुती पडेल
स्वतःशीच बजावले
कर्तव्यापोटी मनाला समजावणे
हेच आता हाती उरले....
~सागर
No comments:
Post a Comment